Skip to content

दक्षिणेकडचे खवय्येगिरी -3 चिकन चेट्टीनाड करी

चिकन अतिशय व्हर्सटाईल जिन्नस आहे – हजारोंनी रेशीप्या असतील. पण जेव्हा चिकन + नारळाच्या दुधाला, खमंग मसाल्याची जोड मिळते तेव्हा चेट्टीनाड करी नावाचा स्वर्गीय पदार्थ तयार होतो.
खवय्येगिरीच्या आधीच्या पोस्ट सारखीच(दक्षिणेकडची खव्वयेगिरी–१, दक्षिणेकडची खव्वयेगिरी–२), ही रेशिपी सुद्धा अगदी पारम्पारिक – दक्षिणेतल्या चेट्टेनाड (तमिळनाडूचा किनारपट्टीचा भाग)भागातील  आहे. करायला थोडी वेळखाऊ आणि किंचित किचकट आहे पण श्रमाचे सार्थक करणारी आहे.

साहित्य(४-५ लोकांसाठी):
१. १ किलो चिकन तुकडे करून (मी ब्रेस्ट घेतले होते)
२, १ मोठा लाल कांदा – अगदी बारीक चिरून
३. २ मध्यम टोमेटो – बारीक चिरून
४. १०-१२ कढीपत्त्याची ताजी पाने
५. नारळाचे कपभर घट्ट दुध
६. मीठ – चवीनुसार
७. हळद – फोडणीसाठी
८. फ़ोडणीसाठी तेल – ५ ते ६ टे.स्पू.
९. आले-लसूण पेस्ट – छोट्या लिंबाएव्हढी
१०. चेत्तेनाड मसाला – कृती खालील प्रमाणे

चेत्तेनाड मसाला:
खालील जिन्नस जाड बुडाच्या कढईत, मंद आचेवर एखादा मिनिट भाजून घ्यावे(करपता कामा नयेत पण छान सुवास सुटला पाहिजे). कढईतुन बाजूला काढावे.
जिन्नस गार झाल्या नंतर मिक्सर मध्ये वस्त्रगाळ दळून घ्यावे.
१/२ टे.स्पू. काळी मिरे
१/२ टे.स्पू. जिरे
३/४ टे.स्पू. बडीशोप
२ टे.स्पू. धणे
१ जायपत्री
१-१/२ इंच दालचिनी
२-३ वेलदोडे
८-१० लाल मिरच्या
३-४ लवंगा

 

कृती:
१. चिकन रात्रभर मीठ, चिमुट-भर गरम मसाला, तिखट, हळद आणि पाउण-एक कप दह्यात मेरीनेट करावे.
२. पातेल्यात तेल घेऊन कढीपत्ता आणि चिरलेला कांदा टाकून, कांदा गुलाबी होईस्तोवर परतावा – एखादा मिनिट.
३. परतलेल्या कांद्यात आले-लसूण पेस्ट घालून एखादा मिनिट अजून परतावे.
४. मेरीनेट केलेले चिकनचे तुकडे वरील मिश्रणात घालून ५-७ मिनिट मोठ्या आचेवर परतावे. चिकन व्यवस्थीत हलवावे.
५. मिश्रणाला बाजुने तेल सुटले की चीकनची आच मध्यम करून मीठ(मेरीनेट मध्ये मीठ असतेच – त्या अंदाजाने वरुन घालावे 🙂 ), चिरलेला टोमेटो घालून ५-७ मिनिट परतावे.
६. नंतर नारळाचे दुध घालून साधारण १२-१४ मिनिट शिजवावे. मिश्रण मध्ये-मध्ये हलवत राहावे (किंवा घाई असेल तर कुकरची एखादी शिटी काढावी )
७. सर्वात शेवटी चेत्तेनाड मसाला घालून ३-५ मिनिट शिजवावे.
८. ग्यास बंद करावा आणि करी वाढण्या आधी १५-२० मिनिट मुरु द्यावी
संपूर्ण कृतीत कुठेही पाणी घालायची गरज नाही – कांदा, टोमेटो, चिकन इ. ला पाणी सुटते, शिवाय नारळाचे दुध असतेच.

मला वाटते – सगळी मजा ताजा दळलेला मसाला, ताजे नारळाचे दुध आणि मंद आचेवर शिजवणे ह्यात आहे.
फोटो काढायच्या आधीच करी संपली त्यामुळे पुढच्या वेळेस करीन तेव्हा आठवणीने येथे लावीन 🙂  असो, ट्राय करा आणि नक्की कळवा.
चिअर्स !!

Categories: Recipe, मराठी.

Comment Feed

No Responses (yet)



Some HTML is OK

or, reply to this post via trackback.