केरळ ट्रीपवर गेलात तर सकाळी ६-७ च्या सुमारास केरळातल्या कुठल्यातरी स्टेशनात गाडी शिरते आणि प्लॅटफॉर्मवर “अप्पम-मुट्टै ऽऽ” अशा आरोळ्या ऐकू येतात. आपण धडपडून उठतो आणि खिडकीतून हात बाहेर काढून ते पुडकं हातात घेतो.
पुडक्यातले केळीच्या हिरव्यागार पानात गुंडाळलेले वाफाळते जाळीदार अप्पम आणि सोबत खमंग गरमा-गरम मुट्टै हा एक न्याहारीचा स्वर्गीय प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तसंही केरळला “गॉडस् ओन कंट्री” असंच म्हणतात म्हणा ( आता तिकडच्या लोकांना “डेव्हिलस् ओन पिपल” म्हणतात ते जाउद्या ). मल्याळी कट्टर ब्राम्हणी (नंबियार वगैरे) घरात मुट्टैला( म्हणजे अंडाकरी) स्ट्यु हा एक उत्तम पर्याय असतो.
असो. आठवणींत अधिक न रमता लुसलुशीत आणि नाजूक जाळीदार अप्पम् बनविणे किती सोपं आहे ते बघूया.
साहित्य:
दोन वाट्या तांदुळ
पाव वाटी शिजवलेला भात (पाण्यात भिजवून उबदार जागी ठेवावा)/ पोहे
१/२ वाटी खोवलेले खोबरे. चिमुटभर यीस्ट सिद्ध करून(मूळ पाकृ.त ताडी (हो, ताडीच! )वापरतात).
२ टे. स्पू. साखर.
कृती:
तांदूळ प्रथम आठ-दहा तास पाण्यात भिजत घालावेत. नंतर ते तांदूळ, खोबरं, आणि भात किंवा पोहे असं सगळं अगदी गंध वाटून घ्यावेत. वाटताना पाणी अगदी कमी घालावे(वाटले जाईल इतपतच). नंतर यीस्ट आणि साखर वाटणात घालून नीट हलवून घ्यावे. उबदार जागी मोठ्या भांड्यात ८-१० तास झाकून ठेवावे (मिश्रण खूप फुगते त्यामुळे भांडे छोटे घेतले तर नक्की उतू जाईल).
अप्पम करायच्या आधी फुगलेल्या पीठात चवीनुसार मीठ आणि गरजे नुसार पाणी/दूध घालून ते पातळ करून, नीट हलवून घ्यावे. पीठ इडलीच्या पीठाएव्हढे घट्ट/पातळ असावे.
तेलाचा हात फिरवून अप्पम पॅन (मी लोखंडाची कढई वापरली) मधे पळीभर पीठ घालावे आणी चटकन कढईचे कान धरून ४५अंशाच्या कोनातून फिरवावे म्हणजे पीठ नीट पसरेल (पीठ पसरवायला पळी वापरू नये). आवडत असल्यास अप्पमच्या खळग्यात थोडे दूध घालावे. बशीच्या आकारातले अप्पम शिजल्यावर कडा सुटून यायला पाहिजेत. गरमा गरम अप्पम व्हेजिटेबल स्ट्यु सोबत वाढावे.
व्हेजिटेबल स्ट्यु साहित्य :
१ मोठा कांदा, पातळ चिरून
२-३ हिरव्या मिरच्या तुकडे करून
१/२ टेस्पू. आलं-लसूण पेस्ट
एखादी काडी कढिलिंब
१ बटाटा चौकोनी तुकडे करून
१ गाजर तुकडे करून
थोडेसे मटार
अननस (ऐच्छिक)
नारळाचे घट्ट दूध – १/४ वाटी
नारळाचे पातळ दूध – १ वाटी
२-३ टेस्पू. तेल
खडा मसाला – २ इंच दालचिनी, ५-६ लवंगा, ४-५ काळे मिरे , एखादं चक्री फूल, १-२ वेलदोडे
चवी प्रमाणे मीठ
कृती:
तेल गरम करून खडा मसाला थोडा परतून घ्यावा. नंतर कांदा, आलं लसूण पेस्ट, मिरची आणि कढीलिंब टाकून कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा. त्यात भाज्या, असल्यास अननस घालून मिनिटभर परतून घ्याव्यात. नारळाचे पातळ दूध घालून भाज्या शिजू द्याव्यात (१०-१२ मि.)
शेवटी शिजताना नारळाचे घट्ट दूध धालून २-४ मिनीटे उकळी आणावी.. अप्पम बरोबर स्ट्यु तयार आहे.
[…] सारखीच(दक्षिणेकडची खव्वयेगिरी–१, दक्षिणेकडची खव्वयेगिरी–२), ही रेशिपी सुद्धा अगदी पारम्पारिक – […]