“येत्या शनीवारी मोकळा आहेस ना?” श्री. पार्क श्रीकांतला विचारत होते. “हो, आहे की. का बुवा काही जास्तीचे काम आहे ऑफिसमधे?” श्रीकांतची शंका. “अरे, आपल्या पूर्ण गटाला अर्धा दिवस प्योंगतेकला जायचे आहे विसरलास की काय?”
पूर्व आशियातल्या इलेट्रॉनिक्स आणि भ्रमणध्वनि बनविणार्या प्रसिद्ध संस्थेच्या एका संशोधन-आणि-नवनिर्मिती विभागात चाललेला हा संवाद.
ह्या विभागाने आमच्या संस्थेची आज्ञाप्रणाली वापरायला नुकतीच सुरवात केली आहे. त्यामुळे आज्ञाप्रणाली वापरताना तिथल्या अभियंत्यांना आलेल्या अडचणी सोडवणे, प्रणालीतल्या त्रुटींचे निवारण आदी कामानिमित्त माझे इथे गेले काही महीने दररोज जाणे येणे होते. कामाच्याबरोबरीने आमच्या इतरही गप्पा-टप्पा होतात.
हुशार आणि कष्टाळू अश्या अभियंत्यांचा हा गट मोठा दिलखुलास वृत्तीचा आहे! कामाच्या वेळी मान मोडून काम करणारी ही तरूण मंडळी शनि-रवि च्या दिवशी(आणि रात्री) अगदी बेभान होउन मौजमजा करताना आढळतील. समिष आहार आणि वारूणीच्या संगतीने रात्री उशीरापर्यंत रंगलेल्या गप्पाटप्पा. त्यानंतर कराओके वरची गाणी आणि मग दिवस उजाडायच्यावेळी दमलेल्या अवस्थेत घरी जाणे, रविवार पूर्ण झोपेत(का गुंगीत?)काढणे हातर त्यांचा शिरस्ताच म्हणाना! अशा गटात काही वेगळा विषय दिसतोय म्हणून मी सुद्धा कान टवकारून ऐकायला लागलो.
“अरे आपला गट दरवर्षी स्वतःचा काही वेळ वेगळ्या कामासाठी देतो. गेल्या तीन वर्षांपासून आपण सगळे प्योंगतेक नावाच्या उपनगरात जातो आहोत.” श्रीकांत नुकताच ह्या गटात नोकरीवर रूजू झाला होता त्यामुळे श्री. पार्क त्याला पार्श्वभुमी समजावत होते. “तिथे शहरापासून जरासे आडबाजूला एक मानसिक अपंगत्व आलेल्या मुलांसाठी चालवली जाणारी एक सेवाभावी संस्था आहे. त्या संस्थेमधे जाउन एक दिवसभर जायचे आणि पडेल ते काम करायचे येत्या शनिवारी.”
“मी आलो तर चालेल का? मलासुद्धा आवडेल तिथे यायला” मी विचारले. “हो चालेल की! अरे आनंदच होइल आम्हाला अजून एक जण सामिल झाला तर” पार्क म्हणाले. लगेच बसभाडे आणि दुपारच्या जेवणाची फी अशी जुजबी रक्कम मी भरून टाकली.
होता होता शनिवार(१४ फे.) उजाडला. बसने साधारण एक तासाच्या अंतरावर असलेल्या संस्थेत आम्ही दाखल झालो. झाडून सगळे अभियंते आले होते(स्वेच्छेने, सक्तीने नव्हे!)
“या.. या.. बरं वाटलं आलात ते… आपलं स्वागत आहे!” संस्थेचे संचालक आणि संचालिका (बहुदा पतिपत्नी असावेत) आमचं अर्ध्या वाटेवर येउन स्वागत करत होते. सगळे संस्थेच्या सभागृहात गेलो. स्थिरावल्यावर, संचालिकाबाईंनी पुन्हा एकदा आमचे तिथेआ ल्यावद्दल आभार मानले. (नव्या लोकांसाठी) संस्थेची आणि कामाची थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली. ती संस्था गेली २० वर्षं उदार दाते आणि काही मोजके पूर्णवेळ कार्यकर्ते ह्यांच्या आधारावर, सरकारच्या मदतीविना चालू होती. सध्या तिथे ४५ मुले राहतात. सरासरी वय (शारिरीक) ३५-४० एव्हढे आहे(मानसिक अपंगत्व आलेल्या व्यक्तिचे मानसिकआणि शारिरीक वय ह्यात कमालीची तफावत असते.). त्यातल्या त्यात काही मुलींची स्थिती अवघड आहे. ढकलखुर्चीच्या(व्हिलचेअर) मदतीशिवाय त्यांना कुठेही हालचाल करायला पर्याय नाही.
२-३ मुला-मुलींच्या गटाला एक अशा १५-१६ खोल्या आहेत. खोल्या म्हणजे पक्कं बांधकाम नाहीच. शिपींग कंटेनरसारख्या तकलादू पत्र्याच्या त्या खोल्या. मुख्य सभागृहाच्या एका भिंतीवर भावी दुमजली इमारतीच्या पक्क्या बांधकामाचा आराखडा चिकटवलेला दिसला. पण जमिनीच्या आकाशाला भिडलेल्या किंमती आणि बांधकामाचा सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचा खर्च ह्या मुळे दुर्दैवाने हे काम केवळ आराखड्यापर्यंतच येउन नंतर पैशाअभावी रखडले आहे. (इथल्या हाडं गोठवणार्या थंडीत धडधाकट लोकांची फेफे उडते त्यात ह्या अशा घरात राहणार्या मुला-मुलींची काय अवस्था होत असेल हा विचार करवत नाही.)
पण मूळ बांधकाम सोडले तर बाकी सोयी मात्र वाखाणण्या सारख्या होत्या. मुख्य सभागृहात रक्त दाब मोजायचे अद्ययावत यंत्र, कमरेचा व्यायाम करायची उपकरणे अशा सुविधा, मनोरंजनासाठी ४२ इंची टिव्ही, चित्रतबकडी-चालक (डिव्हिडी प्लेयर), ख्रिस्ताची प्रार्थना करण्यासाठी असलेला पियानो सुद्धा दिसला. बाहेर आवारात कुठल्याही व्यायाम शाळेत असतात त्या तोडीची साधने होती. मी आवर्जून त्यांचे स्वयंपाक घर पाहिला गेलो. एका छोटेखानी संस्थेला लागेल आणि ४०-५० माणसांचा स्वयंपाक दोन तासामधे सहज होइल अशी सर्व उपकरणे, तसराळी, भांडी, गरम/थंड अशा दोन्ही पाण्याची सोय तिथे दिसली. स्वयंपाकघरात कुठेच समिष आहार किंवा मासे इ. चे पदार्थ शिजवल्यावर येणारा विशिष्ट वास जाणवला नाही. निसरड्या जमिनीवरून घसरू नये म्हणून रबराचा लेपसुद्धा दिला होता. राहायच्या खोल्यांमधेजमीन गरम राहण्याची सोय, नेटकी आवरलेली कपाटे, काही खुर्च्या होत्या. असो.
लवकरच संचालिकाबाईंनी आम्हाला कामाची वाटणी करून दिली. मी आणि इतर काही सहकारी संस्थेच्या भाजीपाल्याच्या वाफ्यात गेलो. तिथे पत्रे, लोखंडी तुळया इ. वापरून उगवलेला भाजी पाला साठवण्यासाठी एक शेड उभारली. अर्थात आमच्या सारख्या नवख्या लोकांना हे काम करायला ४ तास सहज लागले.
मधे जेवणासाठी विश्रांती घेतली. हे जेवण आमच्याचपैकी काही मुलींनी बनविले होते. संस्थेतल्या सगळया लोकांची आणि आमची एकच अंगत-पंगत. नंतर उरलेले काम संपवून आम्ही परत जायला निघालो.
निरोप द्यायला संस्थेतली मुले आणि संचालक द्वयी रस्त्यापर्यंत आले होते. परत आम्ही संध्याकाळी शहरात येउन पोहोचलो.
ह्यात पहिला ३-४ मिनीटाचा संचालिका बाईंनी करून दिलेला परिचय सोडला तर कुठेही भाषणे नव्हती की कुणाचा बडेजाव नव्हता. अतिशय साधेपणाने आणि चटपटीत पद्धतीने केलेली कामे आणि इतर दिवशी मुक्त चैनीचे जिवन जगणारी तरूण पिढीची तितक्याच झोकून देउन स्वयंसेवा करायची वृत्ती असा परदेशप्रवासात सहसा न येणारा असा एक वेगळाच अनुभव घेउन मी घरी आलो.
खाली काही काढलेली छायाचित्रे. (चित्रांचा दर्जा काही चांगला नाही त्याबद्दल क्षमस्व.)
- परिचय करून देताना संचालिका
2. आम्ही उभारत असलेला मंडप