वर्षातले ४-५ महिने कडाक्याची थंडी तुमच्या देशात पडत असेल तर कधी एकदा जून उजाडतोय आणि सोबत उन्हाळ्याची उबदार हवा कधी घेऊन येतोय याची तुम्ही नक्की वाट पाहत असणार.
उन्हाळा म्हणजे उंडारणं, पोहणं आणि मित्रमंडळींसोबत बागेत केलेले बार्बेक्यु!
मित्रपरिवारासोबत हसत खिदळत झालेल्या अशा पेटभर मेजवान्यांमधे अजून रंगत भरायची असेल तर पोच्ड पीचेसची चैनदार मुखशुद्धी हवीच!
मला बरेच वेळा प्रश्न पडतो की फळांचा राजा कोण पिवळा धमक रसरशीत देवगडचा आंबा की कौतुकाचं नाजूकसं पीच? असो – फळांचा राजा या दोन्ही पैकी त्याक्षणी जो समोर असेल तो असे मी माझ्यापुरते ठरवून टाकले आहे 🙂
मुळात पीच हे एक अति नाजूक आणि नखरेल फळ. गुलाबी-लालसर रंगाच्या नाजूक छटांच्या मखमली बाह्यरंगापासून वेडावून टाकणारा गंधासोबत, पूर्ण पिकलेल्या रसरशीत मधाळ अंतरंगापर्यंत – नजाकत कुठे म्हणून लपत नाही. त्याला वाईन आणि मधाची साजेशी किंचित मादक जोड असेल तर मग जीभेवर स्वर्ग उतरायचाच बाकी राहतो !
चला तर मग झटपट साहित्य आणि कृती लिहून घ्या –
साहित्य
१. पीचेस – ४ मध्यम आकाराची, पूर्ण पिकलेली (पण मऊ पडलेली नको)
२. ड्राय व्हाईट वाईन – ४२५ मिली
३. मध – पाव कप
४.दालचिनी – १/२ इंच तुकडा
५. लवंगा – १-२
कृती
१. प्रथम पीचेस स्वच्छ धुवून, आतली बी काढून, अर्धे तुकडे करून घ्या
२. एका जड बुडाच्या भांड्यात मध, वाईन, दालचिनी, लवंगा एकत्र करा आणि मोठ्या आचेवर ठेवा
३. वरील मिश्रणाला उकळी फुटली की गॅस हळू करा आणि त्यात पीचचे तुकडे टाका.
४. मंद आचेवर पीचचे तुकडे ह्या पाकात शिजूद्या(अंदाजे १०-१५ मि.). पीच शिजले पाहिजे पण अगदी लगदा होईस्तोवर थांबू नये.
५. पीचचे तुकडे एका भांड्यात, पूर्ण गार होईस्तोवर काढून ठेवा. नंतर हवाबंद झाकण्याच्या डब्यात, फ्रिजमधे साठवा
६. एकीकडे पाक आटवून निम्मा करा(अंदाजे १० मि.) व गॅसवरून उतरवा. पाक गार झाल्यानंतर गाळून, काचेच्या हवाबंद बरणीत – फ्रिजमधे साठवा. (अंदाजे एक दिवस आधी)
७. पीचच्या फोडींवर थंडगार पाक घालून सर्व करा 🙂
टीपः
* वाईनच्या ऐवजी पाणी सुद्धा वापरता येईल पण चवीत फरक पडतो .
* मधाच्या ऐवजी साखर आणि प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करता येईल.
* पीच हवाबंद डब्यात, फ्रिजमधे २-४ दिवस चांगले राहतात.
मला माहित नव्हत् कि तू Blog लिहितोस, खूप छान आणि मजा आली वाचायला :), Keep writing
thanks vaghoba