वर्षातले ४-५ महिने कडाक्याची थंडी तुमच्या देशात पडत असेल तर कधी एकदा जून उजाडतोय आणि सोबत उन्हाळ्याची उबदार हवा कधी घेऊन येतोय याची तुम्ही नक्की वाट पाहत असणार.
उन्हाळा म्हणजे उंडारणं, पोहणं आणि मित्रमंडळींसोबत बागेत केलेले बार्बेक्यु!
मित्रपरिवारासोबत हसत खिदळत झालेल्या अशा पेटभर मेजवान्यांमधे अजून रंगत भरायची असेल तर पोच्ड पीचेसची चैनदार मुखशुद्धी हवीच!
मला बरेच वेळा प्रश्न पडतो की फळांचा राजा कोण पिवळा धमक रसरशीत देवगडचा आंबा की कौतुकाचं नाजूकसं पीच? असो – फळांचा राजा या दोन्ही पैकी त्याक्षणी जो समोर असेल तो असे मी माझ्यापुरते ठरवून टाकले आहे 🙂
मुळात पीच हे एक अति नाजूक आणि नखरेल फळ. गुलाबी-लालसर रंगाच्या नाजूक छटांच्या मखमली बाह्यरंगापासून वेडावून टाकणारा गंधासोबत, पूर्ण पिकलेल्या रसरशीत मधाळ अंतरंगापर्यंत – नजाकत कुठे म्हणून लपत नाही. त्याला वाईन आणि मधाची साजेशी किंचित मादक जोड असेल तर मग जीभेवर स्वर्ग उतरायचाच बाकी राहतो !
Continued…