अॅमस्टरडॅम, १६५९. मायगेल लिएन्झो कर्जात गळ्यापर्यंत बुडाला आहे. त्यात दोष सर्वस्वी त्याच्या एकट्याचा नाही म्हणा. सट्टेबाजीला कायदेशीर मैत्रिण मानणार्या जगातल्या त्या पहिल्या-वहिल्या शेअर-बाजारात एका रात्रीत जसे रंकाचे राव होतात तसे मायगेल सारखे रावाचे रंक झालेलेदेखील अनेक होते.
भावाच्या घरात, ओलीने आणि कुबट हवेने भरलेल्या अंधार्या तळघरात उधारीवर राहताना मायगेलला भविष्यात फक्त निराशेचा मिट्ट काळोखच दिसतोय.
दरम्यान अवचितच त्याची एका भुरळ पाडणार्या डच स्त्रीशी – गर्ट्र्युडशी ओळख होते. एकदा, गर्ट्र्युड पुर्वी कधी न चाखलेल्या पण एकदा प्यायल्यावर चटक लावणार्या कॉफीची चव मायगेलला देते.
आणि दोघे मिळून एक महत्वाकांक्षी योजना आखतात – इतर व्यापार्यांना सुगावा लागण्या आधीच ह्या जादुई पदार्थाचा संपुर्ण युरोपात दणकून प्रचार करायचा आणि कॉफीच्या व्यापारावर पुर्ण कब्जा मिळवायचा! बेत यशस्वी झाला तर मग अनेक पिढ्या बसून खातील एव्ह्ढ्या पैशांचे ढिग आपल्या पायांनी चालत येणार! मात्र त्यासाठी मायगेलला आपले कौशल्य आणि बाजारतली पत पणाला लावावे लागेल! शिवाय मधाळ बोलीने, केसांनी गळा कापणारे मैत्रीचा आव आणणारे कट्टर शत्रू जागोजागी टिपून बसले आहेत!
डेव्हिड लिस नावाचा उगवत्या ब्रिटिश लेखकाची “कॉफी ट्रेडर” ही दुसरीच पण क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणारी कादंबरी आहे.
१७व्या शतकातल्या युरोपियन व्यापार्यांची पंढरी असणार्या अॅमस्टरडॅम शहरात हे कथानक घडते. अनेक जाती-धर्माचे रिती रिवाजांचे व्यापारी तिथे ट्युलीपची फुले, चॉकोलेट, मसाल्यांचे पदार्थ, रेशिम अशा अनेकाविध गोष्टींची उलाढाल करायचे. जगाच्या कानकोपर्यातून अॅमस्टेल नदीच्या तीरी, गोदामांत माल यायचा आणि मायगेल सारख्या चलाख व्यापार्यांच्या हाती म्हणता म्हणता खपून जायचा!
आपला नायक आहे जन्माने “पोर्तुगीज ज्यु”. इतर वेळी धर्माचे कट्टर पालन करणारा पण व्यापारात सर्व विधीनिषेध बाजूला ठेवणारा त्याचा हा छोटासा समाज पैसा मिळवण्याच्या सगळ्या युक्त्या-प्रयुक्त्या कोळून प्यायला होता -काहिसा धंदापाण्यात कुशल असलेल्या मारवाडी बनियांसारखा. त्या समाजातल्या रोजच्या जीवनातल्या घटना, हेवेदावे, प्रेमप्रकरणे, झटपट श्रीमंती आणि छानछोकीत राहण्यासाठी चालणारी धडपड ह्याचे मनोरंजक चित्रण आपल्याला कॉफी ट्रेडर मधे दिसते.
मायगेलचे डावपेच, नानाविध अडचणी, नशीबाने दिलेला हात अशा अनेक घटनांमधून कथानक पुढे सरकत राहते.
आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग असणारा शेअर बाजार, फ्युचरस् आणि अडत या गोष्टींचा पाया इथे रचला गेला. तो शेअर बाजार सुद्धा कथेत अनेक वेळा डोकावून जातो. तिथल्या एजंटांच्या आरोळ्या, घटकेत वर-खाली होणारे भाव, गिर्हाईकाला गटवून जास्तीत जास्त फायदा कसा होईल ह्या विवंचनेत असणारे अडते आणि चढ्या भावात कर्ज देणारे सावकार यांच सहसा कादंबर्यांमधून न दिसणारे जिवंत चित्र कॉफी ट्रेडर मधे बघायला मिळते.
पुस्तकाच्या शेवटी लेखकाची मुलाखत आहे. त्यात पुस्तक लिहिण्याची प्रेरणा (डिग्रीला असताना केलेला अभ्यास/संशोधन), “कॉफी”ची निवड आणि एकूण आर्थिक थरारकथा (फायनान्शियल थ्रिलर)ह्या धाटणी(जेनेर) मागचा विचार विस्ताराने येतो.
‘गारंबीच्या बापू’त असं वातावरण बापूच्या सुपारी-व्यापारात येते खरे पण ते साम्य तितपतच आहे.
शेवटी मायगेल कॉफीच्या व्यापारावर एकहाती हुकमत गाजवण्यात यशस्वी होतो की नाही ते मुळातूनच वाचण्यात मजा आहे. पण ह्या निमित्ताने थोड्या अनवट धाटणीच्या कादंबरीची ओळख करून द्यायचा हा छोटासा प्रयत्न
पुस्तकाचे नावः कॉफी ट्रेडर
प्रकाशनः बॅलेन्टाईन बुक्स
पृष्ठे: ३८६
किंमत: १७$