गेल्या काही दिवसांपासून मी “मिसळ पाव” बद्दल अधुनमधून बरेच काही ऐकत होतो – कधी कर्णोपकर्णी तर कधी मिपाच्या वाचकवर्गांतल्या एकदोघांकडून तर कधी अरूण मनोहरांसारख्या लेखकमंडळींकडून.
आता मिसळपाव हे एक समूह-संकेतस्थळ. तसे पहायला गेलो तर मी ओर्कुट, फेसबुक आणि तत्सम समूह-संकेतस्थळांवर नावा पुरती हजेरी लावतो खरा, पण वावर फार नसल्यातच जमा. अहो दररोज प्रत्यक्ष दिसणारे तेच ते मित्र/मैत्रिणी इथेही पुन्हा भेटणार आणि “अरे, कसा काय? इकडे कुठे? हल्ली काय करतोस?” अश्या शिळोप्याच्या गप्पा मारणार. ह्या गप्पा काय, ईमेल नाहीतर फोनवरून सुद्धा आपण मारतोच की त्यासाठी एका वेगळ्या संकेतस्थळावर जायची गरज काय? शिवाय समूह-संकेतस्थळांवर अपेक्षित असते ती विचारांची देवाणघेबाण, नव्या ओळखी ती इथे नसतेच. ह्याचे कारण मुळात त्या-त्या संकेतस्थळांच्या बांधणीत आणि मांडणीत आहे. खरडवही हा त्यांचा पाया त्यामुळे, आपल्याला जो कोणी खरड लिहील तो (किंव्हा आपण ज्याला खरड लिहू तो) काय म्हणतोय ह्या पलिकडे फारशी देवाणघेवाण होतच नाही. अर्थात तिथेही “समूह” असतात, नाही असे नाही पण ते सुद्धा विषयावार. त्यामुळे कुठल्याही अशा समूहात एकापेक्षा अधिक जास्त विषयांवर होणार्या चर्चांची मांडणी ही फक्त मोठ्ठी यादी असते. तिथे येणार्या व्यक्तिला रुचेल/पटकन कळेल अशा स्वरुपाची केलेली नसते.
असो. तर अशा अनेक संकेतस्थळांमध्ये आणि मिसळ-पावमध्ये काय फरक असणार हा माझ्या मनातला पहिला विचार (दुसरे म्हणजे, आंतरजालावर संकेतस्थळांची “झाले ही बहु, होतील ही बहु” अशीच गत असते. “या सम हाच” सोडाच पण चिमण्यांच्या थव्यासारखी “काल होते इथे…आज गेले कुठे”हीच नश्वर अवस्था फार). तर ह्या पार्श्वभुमीवर मी मिसळ-पावला भेट द्यायला फारसा उत्सुक नव्हतो. तरी सुद्धा एकदोन आठवड्यांनी, घाईघाईतका होइना भेट देवूनही पाहिली होती. एकूण संकेतस्थळाचे नाव आणि मुखपृष्ठावरचे मिसळीचे तोंडाला पाणी सुटवणारे चित्र पाहून थोडी गंमतसुध्दा वाटली. पण तो उत्साह तिथवंरच टिकला.
काही दिवसांनी माझ्या स्वतःच्या संकेतस्थळावर मराठी लेखनाचा श्री गणेशा कर्ण्याच्या निमित्ताने गमभन चा निर्माता ओंकारची ओळख झाली. तेव्हा मिपाच्या मांडणीचा/लेखनाचा संर्दभ घ्यायला मिपावर फेरफटका मारत असे. अशाच एका संध्याकाळी जेवणाची वेळ झाली होती. बाहेर थंडी मी म्हणत होती (उणे ६-७ अंश तापमान आणि सुसाट वारा). मी “बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी” ह्या न्यायाने एकटाच (आणि भुकेला) बसलो होतो. अशा अवस्थेत सहज मिपा उघडले आणि समोर पांथस्थांची सचित्र रुई माछ भापे – (वाफवलेला रोहु मासा)” ही जिवघेणी पाककृती दिसली. खरं सांगतो, त्याक्षणी मी अक्षरशः भुईसपाट झालो! (बाय द वे, पांथस्थांना अशा सचित्र पा.कृ. मिपावर प्रसिध्द करून हाहाकार उडविण्याबद्दल काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावणे गरजेचे आहे.)
मी जन्माने भट, पण देवी-मंगेशीच्या कृपेने आमचे सगळे शेजारी सारस्वत होते त्यामुळे पापलेट-वरणभात/कोळंबीचे कालवण/मटणाचा खिमा इ. माझे विशेष जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्या विषयातला एक जादुगार मिपावर असा अवचित भेटल्यावर माझा मिपाबद्दलचा आदर वाढीस लागला.
त्यानंतर मी आणखी काही हाती लागले तर पाहूया अशा विचाराने थोडा जास्त वेळ मिपावर घालवायला लागलो. आणि हाहा म्हणता तात्यांची “दळवी”-इश्टाइल बरीचशी हृद्य आणि थोडीशी आंबट अशी व्यक्तिचित्रे, पुस्तक परीक्षणे, शास्त्रीय संगीत/राजकारणावरच्या नित्य रंगलेल्या चर्चा, प्रवास वर्णने(आणि हो, अगदी “बाचाबाची” पर्यंत येणारी भांडणेसुद्धा) अश्या अस्सल मराठी माणसाला आपुलकी वाटणार्या गोष्टींचा हा एव्हढा खजिना हाती लागला. शाळेच्या ग्रंथालयात नविन आलेल्या पुस्तकांची शेल्फं बघून व्हायची तशी अवस्था झाली माझी.
काही मिपाकर मंडळींच्या खरडवह्यांमध्ये “आम्ही मिपा वर दिवसाचे किमानपक्षी दहाएक तास घालवतो” अशा काही नोंदी आहेत त्यात काही अतिशयोक्ति नाही याची मग खात्री पटली.
मी सुद्धा हल्ली मिपावर पडिक असतो. वाटलच तर चाललेल्या चर्चांमध्ये भाग घ्यावा नाहीतर जुन्या नोंदी वाचित राहावे – पाहता पाहता दिवस कसा निघून जातो हे कळतही नाही. आणि ह्या उपर कंटाळा आलाच तर सोबतीला पोट दुखेपर्यंत हसवणारा जैनांच्या कार्ट्याचा आणि अवलिया इ.चा टारगटपणा, ३_१४ व्यस्त अदिती चा लवंगी मिरचीचा ठसका आणि प्रा. डॉ. चा गमतीशीर पण आढात्यखोर नसलेला “प्राज्ञ” पणा हा असतोच.
ह्या सगळ्याला एकत्र बांधून ठेवणारा दुवा म्हणजे मराठीतून मुक्त अभिव्यक्ति(“ओंकार जोशी झिंदाबाद…!!”) करण्याची सोय(आणि मुभा!) आणि वापरायला सहज-सोपी अशी निलकांताने केलेली ड्रुपलवर आधारित मांडणी. अर्थात, सरपंच तात्यांचा अदृश्य असा दिपोटीरूपी वावरही तितकाच महत्त्वाचा (“इथं अवांतर नको, ख.व.वर बोलूया… तात्या वराडतो” इति एक मेंबर). तरी अजून संपादक-मंडळ नावाची व्यक्ति काही माझ्या पाहण्यात आलेली नाही. बहुदा, ह्या लेखावर टिका करताना ओळख व्हावी!
पण काही गोष्टी मला अजून तितक्याशा कळलेल्या नाहीत. तांत्रिकगोष्टीं मध्ये, एक प्रर्कषाने जाणविणारी गोष्ट म्हणजे लेखनाचा कच्चा मसुदा साठवून ठेवण्याची सोय इथे मला दिसली नाही. आता एखाद्याला मिपावर भला मोठा लेख लिहीताना ही सोय अतिशय उपयुक्त पडेल ह्यात शंका नाही.
दुसरे म्हणजे मिपा हे एव्हढी येजा असणारे प्रसिद्ध संकेतस्थळ, त्याचा चालविण्याचा खर्च सरपंच स्वतःच्या खिशातून करताना दिसतात. हे धोरण स्तुत्य असले तरी स्वस्त निश्चितच नाही. तर मग ह्यासाठी जाहिराती किंवा अशाच मार्गाचा अवलंब करायला काय हरकत आहे?
अजुन एक – लेख ज्या प्रकारे लिहावा किंवा जी भाषा वापरून चर्चा करावी ह्यांची धोरणे जुन्या लोकांना माहित असतील (कदाचित स्वयंशिस्तसुद्धा असु शकेल…) पण तीच सगळी माहिती मिपावर “वाविप्र” सारख्यासदराखाली प्रसिद्ध करायला हवेत. नविन येणारी सगळीच मंडळी धट असतील असे नाही (एखादा उद्धटही निघायची शक्यता आहे. – आंतरजालावर गोगलगायींपेक्षा “लांडगेच” जास्ती असतात.)
असो. स्फुट लिहावे म्हणून बसलो आणि लेख मारुतीच्या शेपटीसारखा लांबत चालला आहे. तेव्हा उरलेले मिपाबद्दलचे विचार पुन्हा कधीतरी.
आपला,
(प्रेमवीर) विंजिनेर
त.टि.- हा लेख लिहिण्याआधी अभ्यास म्हणून एक-दोन चर्चा सुरू केल्या होत्या. त्या चर्चा म्हटले तर निरूपद्रवी आणि उत्तराची फार अपेक्षा नसलेल्या होत्या. पण राव, म्हणता म्हणता काय एक एक प्रतिसाद मिळाले वा! काही खुसखुशीत तर काही एकदम ठसका लावणारे झणझणीत. पण सगळे एकजात (प्रतिसाद देणार्यांच्याही नकळत) मिसळ-पावच्या नावाशी इमान राखणारे – एकदा चव घेतल्यावर प्रेमात पडावे असे. तेव्हा “संपादक मंडळ” अश्या चर्चांची योग्य तेवढीच दखल घेतील याची खात्री आहे.
-वि.