Skip to content

अभंग – पंढरीचे भूत मोठे

काही दिवसांपूर्वी गायत्री आणि रजनी ह्या भगिनीद्वयीचा चंद्रकौंस रागात गायलेला संत तुकोबांचा अभंग कानावर पडला.
दोघींची गायकी निर्विवाद अव्वल दर्जाची आहे. कर्नाटकी ढंगात गायलेल्या हिंदुस्तानी रागाची मांडणी सुरुवातीपासून तुमची पकड घेते, शब्दोच्चार सुद्धा स्वछ आहेत. मूळ अभंगाबद्दल तर काय सांगू म्हराजा – कसे भुरळ पाडणारे शब्द, कशी ती भाषा – वा वा ..

खाली अभंगाची लिंक दिली आहे तर तळाशी श्री. श्रीकृष्ण वसंत पुराणिक यांनी केलेले तितकेच सुंदर निरूपण सुद्धा देत आहे.

पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे || बहू खेचरीचे रान | जाता वेडे होय मन ||
तेथे जाऊ नका कोणी | गेले, नाही आले परतोनी || तुका पंढरीस गेला | पुन्हा जन्मा नाही आला ||
तुकाराम गाथा  २७३७
“पंढरीचे भूत मोठे” राग चंद्रकौंस, रजनी-गायत्री


(१) बाह्यार्थ: वारीहून परतलेल्यांचं ओवाळणं वगैरे का होतं हे समजून घ्यायला हा अभंग पुरेसा आहे असं वाटतं. पंढरी म्हणजे झपाटून टाकणारं, स्वतःमध्ये, पांडुरंगामध्ये, भक्तांना विलीन करून घेणारं, असं हे सर्वश्रेष्ठ भूत आहे. स्वतः तुकाराम महाराजच म्हणतात, की मी गेलो ते परतलोच नाही. निंबलोणाबाबतही तुकारामांनी असंच विलक्षण भाष्य केलं आहे.

आपले ऐसे म्हणावे | करितो जीवे निंबलोण ||

निंबलोण असं करायला हवं, की देव आणि भक्त यातलं अंतरच संपून जायला हवं. ते तेव्हाच संपतं, जेव्हा परमेश्‍वरावर आपण मुटका आणि भाकरीच्या तुकड्याऐवजी जीवच ओवाळून टाकतो. परतणाऱ्या दिंडीचं निंबलोण करण्यामागं कदाचित अशीच भावना असेल. आपण पंढरीला न जाताही गेलो आणि पांडुरंग होऊन आलो, असं वारीबाहेरच्या लोकांना वाटत असत. मुटका नि भाकरीने ओवाळताना तो भाव असतो आणि क्षणभर का होईना पण ते सुख मिळते. हे वाटणं, तसं समजून घेणं कठीण असतं. ज्याला वाटतं त्याला आणि ज्याला समजून घ्यायचं आहे त्याला देखील एक निकोप, निर्मळ आणि विशाल मन असावं लागतं, निरपेक्ष होऊन “विठ्ठल विठ्ठल‘ म्हणणारं. हा झाला बाह्यार्थ आता गुढार्थ बघू यात.

(०२) गूढार्थ: आपल्या अंतरायात अर्थ शोधू गेलो तर तो पंढरीचा राया, सत-चित-आनंदघन परमात्मा याला भेटायला जाणे, किंवा भेटण्याची इच्छा होणे हे देखील एक पूर्व-सुकृत असते. ते देखील त्या भगवंताच्या मर्जीनुसारच होते. आणि ते कधी होते तर त्या जीवाची तशी अध्यात्मिक तयारी झाली असेल तर, त्या पायरीवर तो आला असेल तर. तो भाव, ती भक्ती, ते शुद्ध भावातले समर्पण, काहीही इच्छा न ठेवता ते प्रेम, आत आले असेल तर, असे भाव ठेवून नेत्राश्रु त्या भगवंताची वाट बघत असतील तर. एका योग्याची ती अवस्था आहे. ती अवस्था संतश्रेष्ठ तुकोबारायांची झाली होती म्हणून तर ते म्हणतात की, “तुका पंढरीस गेला | पुन्हा जन्मा नाही आला ||”.

तर अशा पायरीवर जो सद्भक्त, योगी आला, त्यालाच फक्त इथे “येणे” या शब्दाचा शब्दश: अर्थ गवसला आहे. आणि मग त्याच्यासाठी या ओव्या आहेत, “पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे ||”. त्या अशा योगियांचे हे पंढरीचे दैवत वाट बघत असते. त्यालाच हे पंढरीचे भूत म्हणजे पांडुरंग, भुतासारखी झडप घालते आणि आपल्या सारखे करते, आपल्यात सामावून घेते.

इथे “खेचरीचे रान” हा शब्द योगिक क्रिया दर्शवितो. खेचरी मुद्रेचे ध्यान ही एक योगिक क्रिया आहे. खेचरी मुद्रा ही एक अति अंतिम, अति उत्कट अशी क्रिया आहे. ही खेचरी मुद्रा आपल्यासारखा कुणीही लावू शकत नाही, मुळात खेचरी मुद्रा अहं भाव ठेवून लागतच नाही, ज्याचा अहं सुटला, जो भगवंताला स्व-अर्पित, समर्पित झाला आहे, त्याचीच लागते. त्यामुळे “मी” खेचरी मुद्रेत ध्यान करतो इथे “मी” आला म्हणजे संपलेच समजावे. हा भोंदूपणा आहे. असे भोंदू लोक आपल्याला पदोपदी भेटतात. आणि पुन्हा इथे खेचरी मुद्रा या नावाने आपण पुस्तकात जे वाचतो, नेटवर जे छायाचित्र बघतो ते अपेक्षित नाही.

योगिक खेचरी मुद्रेचे ध्यानाचे अति उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंताचे उड्डाण हे आहे. ध्यानामध्ये जेव्हा सगळे करून संपते, जेव्हा आपला अट्टाहास संपतो, अपेक्षा संपतात, तेव्हा आपण भगवंताला शरण जातो आणि सर्वस्व अर्पण करतो, नेत्राश्रु नयनी येतात. हनुमंतांनी सगळीकडे सीतामातेला मीपणाने शोधून संपल्यावर त्यांची शेवटची अवस्था येते, ते हार मानतात, आणि म्हणतात, “भगवंता, आता माझे प्रयत्न संपले, आता केवळ तूच मला मदत केली तर मला माता सापडू शकेल. आता माझा “मी” इथे संपला आहे.” या अंतिम अवस्थेत, असे भगवान श्रीरामांचे स्मरण करून त्यांनी खेचरी मुद्रा लावली आणि त्या मुद्रेत त्यांनी भगवंताला स्व अर्पित, समर्पित भावाने विनंती केली की हे श्रीरामा, हे माझ्या प्राणा, हे आत्मरुपा, हे सत चित आनंद घन परमेश्वरा, मला हा सागर पार करून सीतामातेकडे श्रीलंकेमध्ये पोचवं. अशी अवस्था झाल्यामुळेच, किंवा झाल्यावर त्यांना सीतामाता श्रीलन्कापुरीत आहे याचे अंतर्ज्ञान झाले. (बाह्य रामायण आणि अंतरायातले रामायण पुन: भिन्नच आहे.) आणि भगवंताने त्याची ती इच्छा पूर्ण केली.

हा भाव अपेक्षित आहे, हे ध्यान अपेक्षित आहे, ही पायरी अपेक्षित आहे त्या साधकाची साधनावस्थेत. खेचरी मुद्रेमध्ये साधक योगी असे दैवी सामर्थ्य प्राप्त करतो, तो योगी साधनावस्थेत शरीर अंतराळात नेऊ शकतो. (ख = आकाश, चरी = चरणे किंवा विहरणे, घेवून जाणे, विचरण करणे) आणि त्यात देखील त्या योग्याची अवस्था, त्याचे मन कुठवर पोचू शकते त्यावर तो आपल्या शरीराला प्रत्यक्ष किती वर नेऊ शकतो ते अवलंबून असते. एखादा साधक एक इंचच शरीराला वर नेऊ शकतो तर एखादा एक वीत, एक हात, तर हनुमंतासारखे साधक जे साक्षात शिवस्वरूप आहेत ते शरीराला परदेशी, लंकेत घेऊन जाऊ शकतात. किंवा सूर्याला गिळण्यासाठी त्याच्यापर्यंत पोचण्याचे धारिष्ट्य करू शकतात. इथे हनुमंतांचा आपल्या सदगुरुप्रतीचा समर्पण भाव, आणि त्यांनी सदगुरूंना केलेली विनंती, शुद्ध भावातली, शुद्ध कार्यासाठी केलेली आळवणी महत्वाची आहे, आणि केवळ म्हणूनच ते हे उड्डाण करू शकले. “मी” आला तर प्रत्यक्ष भगवंतांचा म्हणजे श्रीरामांचा दगड देखील तरंगला नाही हे उदाहरण आहेच.

तर अशा विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंग नावाच्या भूताकडे जेव्हा एखादा साधक संपूर्ण समर्पित भावाने, प्रेमाने त्याचा होण्यासाठी येतो, तेव्हा ते भूत असे अंगात शिरते की आपल्यातील अहंकाराला, अभिमानाला, काम-क्रोधादि षड्रिपूंना क्षीण करते. साधकांच्या संचितावर कार्य करायला सुरुवात करते. चित्त वृत्ती शुचिता सुरु करते. आणि म्हणून संत तुकोबाराय म्हणतात की स्वतःला वेडे करवून घेण्यासाठी मी पंढरीला गेलो नि पुन्हा संसारात नाही परतलो, पांडुरंगमय झालो असे म्हणतात. हे गूढ अर्थातले ‘पंढरी’ आणि ‘पांडुरंग’ म्हणजे नेमके काय हे आपण एका लेखभागात बघितलेच आहे, त्यामुळे ते पुन्हा इथे देत नाही.

आपण साधनेला बसतो, ध्यानाला बसतो, शांत बसण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपले मन कसे आणि कुठे कुठे भरकटते ते आपल्याला चांगलेच माहित आहे. त्याला आपण कसे खेचून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो ते देखील साधकांना माहित आहे. त्यासाठी नामाचा उपयोग करतो, भ्रूमध्य ध्यानाचा वापर करतो, सदगुरुंबरोबर घालवलेले, साठवलेले क्षण आठवतो. शेवटी त्यांनाच कृपा करायला विनंती करतो, तेव्हा कुठे ते मनाचे धावणे संपते. आणि म्हणून खेचरी मुद्रेतल्या ध्यानाचा उल्लेख इथे तुकोबारायांना करावासा वाटला असेल.

असे ध्यान लागले तर काय होते तर “जाता वेडे होय मन ||”, तर योगियाला योगिक क्रियेत, योगिक साधनेत अपेक्षित असलेले साध्य होऊन मन वेडे होते, म्हणजे आनंदातिशयाचा उद्रेक होतो, मन तद्रूप होते. आणि म्हणून तर तिथे इतर कुणी जाण्यात काही अर्थच नाही या भावाने तुकोबाराय म्हणतात की, ” तेथे जाऊ नका कोणी | गेले, नाही आले परतोनी ||” जे त्या भावातून गेले, ते परतून आले नाही. त्यांना जीव-शिवाच्या मिलनाचा आनंद मिळाला. महाराज म्हणतात, ते माझ्यासारखेच परतून आले नाही. ते तिथेच विसावले. अहो असा परमोच्च आत्मानंद एकदा का मिळाला तर साधक तिथून परतून कशाला येईल.

ही तुकाराम महाराजांची आणि पर्यायाने या स्थितीला पोचलेल्या साधकाची अवस्था सांगितली आहे पदाच्या गुढार्थामध्ये.

अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त.

श्रीगुरुचरणरजानंदसेवक

श्रीकृष्ण वसंत पुराणिक

मूळ लेख इथे आहे.

Categories: Travel.

Comment Feed

No Responses (yet)



Some HTML is OK

or, reply to this post via trackback.